श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला देशपातळीवरील 'तांत्रिक कार्यक्षमतेचा' राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला देशपातळीवरील 'तांत्रिक कार्यक्षमतेचा' राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; नितीन गडकरी यांच्या हस्ते दिल्लीत गौरव
नवी दिल्ली / बारामती:
तालुक्यातील नामांकित सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि., नवी दिल्ली यांचा सन २०२४-२०२५ या वर्षातील संपूर्ण देशातील 'तांत्रिक कार्यक्षमतेचा' तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये २२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित भव्य समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या दिमाखदार सोहळ्यास केंद्रीय सहकार राज्यमंत्री गुर्जर, महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह गुजरात, पंजाब आणि झारखंड या राज्यांचे सहकार मंत्री व इतर मान्यवर उपस्थित होते.
कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, वर्क्स मॅनेजर नारायण नायकोडे आणि चीफ केमिस्ट शिवशंकर भोसले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सभासद व कामगारांचे योगदान मोलाचे – राजेंद्र यादव
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी सांगितले, "दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेला आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर असणाऱ्या सोमेश्वर कारखान्याने गेल्या वर्षी देशातील सर्वोत्तम कारखान्याचा पुरस्कार मिळवला होता. त्यापाठोपाठ यावर्षी तांत्रिक कार्यक्षमतेचा हा दुसरा मानाचा पुरस्कार मिळाला आहे."
पुढे बोलताना त्यांनी या यशाचे श्रेय देताना सांगितले की, "हा पुरस्कार कारखान्याचे सर्व सभासद, शेतकरी बांधव, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संपूर्ण संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदार, मजूर आणि हितचिंतक यांच्या कष्ट आणि विश्वासाचे फळ आहे."
१३ वर्षांत १३ राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गेल्या १३ वर्षांत सातत्याने सर्वोच्च ऊसदर देऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. सन २०१३ पासून कारखान्याला राज्य व देशपातळीवरील एकूण १३ विविध पुरस्कार मिळाले असून, यामुळे कारखान्याच्या पारदर्शक कारभारावर आणि प्रगतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. कारखान्याचा हा चढता आलेख आणि यशाची परंपरा यापुढेही अशीच कायम राहील, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय पातळीवर सोमेश्वर कारखान्याचा गौरव झाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम रामराजे जगताप, व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळाने सर्वांचे अभिनंदन केले असून, संपूर्ण सभासद वर्ग आणि परिसरातून कारखान्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post a Comment