टी सी कॉलेज मध्ये ई-यंत्रण २०२६’ ई-कचरा व्यवस्थापन संपन्न
बारामती :
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथील पर्यावरण शास्त्र विभागाकडून ‘ई-यंत्रण २०२६’ या ई-कचरा जनजागृती व संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन, पर्यावरण संरक्षण समिती बारामती तसेच पर्सिस्टंट फाउंडेशन, पुणे यांचे सहकार्य लाभले.
पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी तसेच वापरात नसलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची योग्य व शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची सवय लागावी, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. हा कार्यक्रम महाविद्यालय परिसरात सलग दोन दिवस आयोजित करण्यात आला होता.
या मोहिमेत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमामध्ये एकूण ४० जणांनी सहभाग घेतला. त्यापैकी पहिल्या दिवशी २० जणांनी तर दुसऱ्या दिवशी २० जणांनी ई-कचरा संकलन मोहिमेला सहकार्य केले.
या मोहिमेद्वारे जुने व वापरात नसलेले मोबाईल फोन, चार्जर, संगणक, लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, प्रिंटर, कॅमेरे तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे संकलित करण्यात आली. यावेळी उपस्थितांना ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, पुनर्वापर व पुनर्निर्मिती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ई-कचऱ्यामध्ये पारा, शिसे व कॅडमियम यांसारखे घातक घटक आढळतात. या पदार्थांची अयोग्य विल्हेवाट लावल्यास माती व भूगर्भातील पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण होतो, त्यामुळे ई-कचऱ्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अविनाश जगताप तसेच उपप्राचार्य प्रा.डॉ. योगिनी मुळे, प्रा.डॉ. अरुण मगर व प्रा.डॉ. सचिन गाडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विज्ञान अधिष्ठाता प्रा.डॉ. विकास काकडे, कला अधिष्ठाता प्रा.डॉ. सीमा नाईक-गोसावी आणि वाणिज्य अधिष्ठाता डॉ. निरंजन शाह यांचेही मार्गदर्शन मिळाले.
या उपक्रमाचे नेतृत्व पर्यावरण शास्त्र विभागप्रमुख प्रा. सुरश्री सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कार्यक्रमासाठी प्रा. मृणाल दाते यांनी प्रभारी म्हणून तर प्रा. अरुणा कदम यांनी समन्वयक म्हणून कार्य पाहिले.
या उपक्रमाप्रसंगी वाणिज्य अधिष्ठाता डॉ. निरंजन शाह, वनस्पती शास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. भगवान माळी, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेंद्र काळे, डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज विभागप्रमुख डॉ. देवा भोसले, संगणक शास्त्र प्राध्यापक डॉ. शशिकांत नखाते तसेच वनस्पती शास्त्र प्राध्यापक डॉ. कावेरी साबळे आणि ‘ई-यंत्रण २०२६’ समन्वयक श्री. अनिकेत भापकर,शिक्षकेतर कर्मचारी श्री. विश्वनाथ मोहरे आणि श्री. नाना शेंडे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे परिसरात ई-कचऱ्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून पर्यावरण संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.
Post a Comment