News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

उपमुख्यमंत्र्यांच्या विशेष प्रयत्नातून वाघळवाडी येथे साकारण्यात येणार अत्याधुनिक रुग्णालय

उपमुख्यमंत्र्यांच्या विशेष प्रयत्नातून वाघळवाडी येथे साकारण्यात येणार अत्याधुनिक रुग्णालय

 विशेष प्रतिनिधी तुषार धुमाळ 
बारामती, दि. २६: 
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाघळवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त शंभर खाटांचे आरोग्य पथक रुग्णालय तसेच वाघळवाडी-सोमेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. 


यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, कार्यकारी अभियंता अमरजीत रामशे, अमोल पवार, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी किशोर माने आदी उपस्थित होते.

आरोग्य पथक रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आराखड्यातील कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेवून पवार म्हणाले, आराखड्यातील रस्ते, पाण्याची टाकी, शवागृह, वाहनतळ, वसतीगृह आदी कामांबाबत केलेल्या सूचनांचा समावेश करुन सुधारित आराखडा तयार करावा.

विकासकामे करतांना परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे. विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री  पवार यांनी केल्या. 

रुग्णालयात सुविधा
वाघळवाडी येथे १० एकर जागेत नवीन शंभर खाटांचे आरोग्य पथक रुग्णालयाच्या बांधकामासाठी ६४ कोटी ४८ लाख रुपये खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. रुग्णालय व परिसरामध्ये १० बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), ५ सुसज्य ऑपरेशन थिएटर, महिला व पुरुष सामान्य कक्ष (जनरल वार्ड), अतिदक्षता विभाग (आय.सी.यू/एन.आय.सी.यू), एक्स-रे कक्ष, प्रसूती व बालरुग्ण विभाग, उपहारगृह, औषधालय, अंतर्गत रस्ते, बगिचा (गार्डन), सुशोभिकरण, वाहनतळ, ८० मुला-मुलींसाठी वसतिगृह आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

प्राथमिक आरोग्य केंद्र:

वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता ४३७.२२ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. केंद्रामध्ये महिला व पुरुषांकरिता प्रत्येकी ३ याप्रमाणे ६ खाटांची क्षमता, वैद्यकीय अधिकारी कक्ष, प्रयोगशाळा, ड्रेसिंग कक्ष, महिला कक्ष, शस्त्रक्रिया कक्ष (ऑपरेशन थिएटर), औषधसाठा कक्ष, स्वच्छतागृह, अभिलेख कक्ष, सोलार सुविधा, अग्निशमन यंत्रणा, फर्निचर, संरक्षक भिंत, वाहनतळ, जागा सपाटीकरणाची कामे करण्यात येणार आहे. या केंद्राअंतर्गत एकूण १३ पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. 

उपमुख्यमंत्र्यांचा आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर

उपमुख्यमंत्री पवार यांच्या प्रयत्नातून बारामती परिसरातील नागरिकांसाठी विविध आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. वाघळवाडी हे गाव बारामती शहरापासून ४० कि.मी. पेक्षा अधिक अंतर आहे, त्यामुळे रुग्णालयाच्या माध्यमातून तालुकाच्या दक्षिण व पश्चिम भागातील तसेच इतर परिसरातील नागरिकांना सर्व वैद्यकीय सोईसुविधा विनाविलंब उपलब्ध होणार आहेत तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त ठरणार आहे.  

या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील कामगार तसेच स्तनदा माता, लहान बालकांचे लसीकरण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवांचा लाभ होणार आहे.

यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक पुरुषोत्तम जगताप यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment