रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता? भोर शहरातील मुख्य पूलावर खड्ड्यांचे साम्राज्य
भोर प्रतिनिधी - कुंदन झांजले
भोर शहरात तालुक्याच्या ठिकाणी प्रवेश करताना राणी लक्ष्मीबाई हा जुना पुल व नवीन असे दोन पूल लागतात. या पूलांवरील रस्त्याची अवस्था पावसाळा सुरू होताच दयनीय झाली असून या रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले असल्याने सध्या होत असलेल्या पावसाने या रस्त्यावर पाणीच पाणी साठल्याने हे पूल खड्ड्यांचे पूल झाले आहेत.
शहरात येण्या जाण्यासाठी दोन मोठे पूल आहेत यामधील असणारा जुन्या पूलावरील रस्ता वारंवार खराब होत आहे . या पूलाच्या रस्त्याचे काम प्रशासन खड्डे पडल्यावर तात्काळ करत आहे , परंतु सदर कामाचा दर्जा हा चांगल्या प्रतीचा नसल्याने पुन्हा वारंवार या पुलावरील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडत आहेत .या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. शाळकरी मुले ,बाजारासाठी शहरात येणारे प्रवासी अशा सर्वांना खड्ड्यांचा नाहक त्रास होत आहे. आजूबाजूला येणारी जाणारी गाडी खड्ड्यामध्ये आपटल्यावर खड्ड्यातील खराब पाणी अंगावर उडल्याने छोटे-मोठे वाद होत आहेत तसेच या खड्ड्यांमध्ये गाड्या आपटल्याने छोटे-मोठे अपघातही या ठिकाणी घडत आहेत . सध्या पावसाची संततधार, रिमझिम सुरू असल्याने संबंधित प्रशासनाने या पूलावरील रस्त्याचे काम त्वरित चांगल्या प्रतीचे करून होणा-या या त्रासापासून नागरिकांची मुक्तता करावी यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी नागरिकांकडून रस्ता दुरुस्तीची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे .
सदर दोन्ही पुलावरील जागेची पाहणी केली असून सदर पूलांवरील साचलेले पाणी काढण्याचे काम त्वरित सुरू केले असून खड्डे देखील त्वरित बुजवले जातील.लवकरच पूलांवरील रस्ता सुस्थितीत करण्यात येईल.
संजय वागज - सार्वजनिक बांधकाम विभाग
Post a Comment