News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

इंदापूर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती; बारामतीत पारदर्शक भूखंड सोडत- हनुमंत पाटील

इंदापूर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती; बारामतीत पारदर्शक भूखंड सोडत- हनुमंत पाटील



*४१ पात्र प्रकल्पग्रस्तांना प्रत्येकी १०० चौ.मी. भूखंडाचे वाटप; सोडत प्रक्रियेत पारदर्शकतेवर भर*

बारामती, दि. १९: इंदापूर औद्योगिक क्षेत्रासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पबाधित शेतकरी व प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) महत्त्वाचे पाऊल उचलले असून पात्र ४१ प्रकल्पग्रस्त अर्जदारांना प्रत्येकी १०० चौरस मीटर क्षेत्रफळाचे भूखंड वाटप करण्यासाठी पारदर्शक सोडत प्रक्रिया बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर )बारामती प्रादेशिक कार्यालयात घेण्यात आली.

उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विशेष भूखंड वाटप समितीच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता सोडत प्रक्रियेला सुरुवात झाली. प्रकल्पग्रस्तांच्या मनातील शंका दूर व्हाव्यात आणि संपूर्ण प्रक्रियेत १०० टक्के पारदर्शकता रहावी, यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन केले.

बैठकीच्या सुरुवातीला उपस्थित सर्व प्रकल्पग्रस्त आणि त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींची ओळखपत्रे व कागदपत्रे तपासून स्वाक्षरीसह उपस्थिती नोंदविण्यात आली. त्यानंतर उपस्थितांच्या संमतीने पीपी ४१ ते पीपी ८९ या उपलब्ध भूखंड क्रमांकांच्या चिठ्ठ्या तयार करून त्या सर्वांसमक्ष पारदर्शक बरणीत टाकण्यात आल्या.

कोणताही मानवी हस्तक्षेप होऊ नये, यासाठी इयत्ता तिसरीतील एका लहान बालकाच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यादीनुसार क्रमांकाने अर्जदारांना भूखंडांचे वाटप जाहीर करण्यात आले. या अभिनव पद्धतीमुळे सोडत प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक झाल्याचे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

या सोडत प्रक्रियेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र व्यवस्थापक महेश बळाळ, उपरचनाकार प्रांजली मंडलिक, सहायक क्षेत्र व्यवस्थापक सागर पाटील आणि प्रमुख भूमापक बाळाजी निलेदार यांनी विशेष परिश्रम घेतले.

बैठकीच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून भूखंड वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. या प्रक्रियेमुळे इंदापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती मिळणार असून, पात्र लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

००००

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment