बारामतीत विद्यार्थ्यांसाठी ‘जागर आरोग्याचा-मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमांतर्गत विशेष चर्चासत्र
*मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती आणि निरोगी जीवनशैलीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन*
बारामती, दि. १५ : नवरात्रोत्सवाच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘जागर आरोग्याचा – मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ या उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या निर्देशानुसार आयोजित या चर्चासत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चर्चासत्रात नशामुक्ती, मानसिक आरोग्य, आत्महत्या प्रतिबंध, निरोगी जीवनशैली, युवकांचे सक्षमीकरण, राष्ट्रनिर्माण आणि विकसित भारताच्या संकल्पनेतील युवकांचे योगदान या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना तंबाखू, मद्य आणि अमली पदार्थांच्या व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले.
तसेच अभ्यासाचा ताण, परीक्षेची भीती, चिंता आणि नैराश्य यांसारख्या मानसिक आरोग्यविषयक समस्यांवर वेळीच मदत व समुपदेशन घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. मानसिक तणावाचा सामना करणाऱ्या मित्रांना योग्य मदत करणे, संकटातील व्यक्तींची लक्षणे ओळखणे आणि गरज भासल्यास व्यावसायिक मदत घेणे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग, पुरेशी झोप आणि स्क्रीन टाइमचे योग्य नियोजन आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. याशिवाय युवकांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सामाजिक जबाबदारी, स्वयंसेवेची भावना आणि राष्ट्रनिर्मितीतील सक्रिय सहभाग विकसित करण्यावर भर देण्यात आला.
महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढण्यास मदत होणार असून, व्यसनमुक्त, मानसिकदृष्ट्या सक्षम आणि सामाजिक भान जपणारे युवक घडविण्यास या उपक्रमातून प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास डॉ.पाटील यांनी व्यक्त केला.
Post a Comment