मतदान केंद्रावर मोबाईल वापरण्यास प्रतिबंध- निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर
निवडणुका पारदर्शक वातावरणात आणि शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन*
बारामती, दि.५ : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाकरिता तालुक्यात ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोबाईल वापरण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे; निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांतता, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ चे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे.
पक्ष आणि उमेदवारांनी मतदान केंद्रापासून २०० मीटर लांब तात्पुरत्या कार्यस्थानी (उमेदवार, पक्षामार्फत चिठ्ठी वाटपाकरिता लावण्यात येणारे टेबल) विनाकारण गर्दी होणार नाही तसेच त्याठिकाणी कोणतेही भित्तीपत्रक, ध्वज, चिन्हे किंवा इतर प्रचार साहित्य लावू नये तसेच कोणत्याही खाद्यपदार्थाचे वाटप केले जाणार नाहीं किंवा गर्दी होईल अशी कोणतीही कृती केली जाणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रामध्ये निवडणूक चिन्ह, पक्ष, उमेदवाराचे नाव असलेले कोणतेही प्रचार साहित्य यामध्ये चिन्ह छपाई केलेले टी शर्ट, टोप्या, उपरणे तसेच छापील चिठ्ठया आदी आणता येणार नाही.
उमेदवार, उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी यांना मतदानाचे निरिक्षणासाठी मतदान केंद्राचे आत ३ मतदाराचे मतदान होईपर्यतच थांबता येईल, त्यानंतर उमेदवाराने मतदान केंद्राच्या बाहेर पडावे. उमेदवार, उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधीस एका मतदान केंद्रामध्ये संपूर्ण मतदानाच्या कालावधीत जास्तीत जास्त तीन वेळा जाता येईल.
मतदानाच्या दिवशी वाहनाच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाचे पालन करुन सर्व पक्षांचे उमेदवार व कार्यकत्यांनी सहकार्य करावे. वाहन परवाना वाहनांच्या दर्शनी भागांवर ठळकपणे लावावे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक उमेदवारास स्वतःच्या किंवा निवडणूक प्रतिनिधीच्या वापरासाठी दोन वाहने वापरण्याचा अधिकार असेल. ही वाहने त्याच्या मतदारसंघातच वापरता येतील. कोणत्याही उमेदवारास अथवा पक्षाला मतदारांची ने-आण करण्यासाठी कुठल्याही वाहनाचा वापर करता येणार नाही.
तथापि खाजगी वाहनांच्या मालकांना त्यांच्या स्वतःच्या खाजगी वापरासाठी वापरण्यात येणारी खाजगी वाहने, खाजगी वाहनांच्या मालकांना त्यांच्या स्वतःसाठी किंवा त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीसाठी मतदानाचा हक्क बजावता येण्याकरिता मतदान केंद्रावर जाण्यासाठी असलेले वाहने, रुग्णालयातील वाहने, रुग्णवाहिका, दूधगाड्या, पाण्याचे टँकर्स,, तातडीच्या वीज पुरवठ्याची वाहने, पोलिसांची वाहने, निवडणुकीच्या कामकाजसंबंधी असलेल्या अधिकाऱ्यांची वाहने यासारख्या अत्यावश्यक सेवां वापरण्यात येणारी वाहने वापरण्यास परवानगी आहे, अशी माहिती नावडकर यांनी दिली आहे.
Post a Comment