बारामतीमध्ये शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धा २० नोव्हेंबरपासून
बारामती:प्रतिनिधी
गुरुवार २० ते रविवार २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत बारामती येथे शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले असून, यामध्ये एकूण ६०० खेळाडू सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद पुणे व बारामती कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होत असून, स्पर्धेसाठी तांत्रिक सहकार्य कराटे-डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, लातूर व छत्रपती संभाजीनगर या ८ विभागांमधून पात्र ठरलेल्या खेळाडूंचा सहभाग असणार असून, त्यात २८८ मुली व ३१२ मुले असे एकूण ६०० स्पर्धक सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, देसाई इस्टेट, बारामती येथे करण्यात आले आहे.
स्पर्धा बारामतीला देण्याबाबत बारामती कराटे असोसिएशनतर्फे करण्यात आलेल्या मागणीवरून क्रीडा विभागाने स्पर्धेस मान्यता दिल्याची माहिती असोसिएशनचे प्रमुख प्रशिक्षक रविंद्र बाळकृष्ण करळे यांनी दिली.
दरम्यान, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जगन्नाथ लकडे तसेच तालुका क्रीडा अधिकारी श्री. महेश चावले यांनी जास्तीतजास्त क्रीडाप्रेमी, खेळाडू व पालकांनी उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.
Post a Comment