पथनाट्याद्वारे महिलांमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती
बारामती : विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या उपक्रमांतर्गत वस्त्रोद्योग विभागात कार्यरत सुमारे 1000 महिला कामगारांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘आला नवा जमाना, झाला मोबाईलचा दिवाना' हे पथनाट्य सादर केले. या नाट्यप्रयोगातून मोबाईल व इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे उद्भवणारे सायबर धोके, ऑनलाईन फसवणूक, फ्रॉड्स याबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सुरक्षित इंटरनेट वापर, मजबूत पासवर्ड्सचा वापर, अज्ञात लिंक व मेसेजेसपासून सावध राहणे अशा महत्त्वपूर्ण बाबी समजावून सांगण्यात आल्या.
या उपक्रमात प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. तसेच विभाग प्रमुख महेश पवार आणि समन्वयक शिक्षक अक्षय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या वतीने शिवानी चेडे, सागर मेरावी, विनया लाखे आणि महेश कांडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
टेक्स्टाईल पार्क येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करताना, सायबर सुरक्षा ही काळाची गरज आहे. महिलांनी तंत्रज्ञानाचा वापर करताना अधिक सजग राहिले पाहिजे. अशा उपक्रमांमुळे समाजात आवश्यक जनजागृती घडते,” असे मत व्यक्त केले.
सायबर सुरक्षा विषयक जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी घेतलेली ही पुढाकार महिलांसाठी उपयुक्त ठरली असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post a Comment