News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील स्वयंसहाय्यता समूहांना कर्ज धनादेश प्रदान

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील स्वयंसहाय्यता समूहांना कर्ज धनादेश प्रदान

महिलांच्या सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन वचनबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार


बारामती, दि.१५: महाराष्ट्र राज्याने महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेतलेला आहे; राज्य नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणाकरिता प्रयत्नशील असून त्यांच्या सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन वचनबद्ध आहे. महिलांचे सन्मान आणि प्रगती ही सामाजिक जबाबदारी असण्यासोबतच महाराष्ट्राचा समृद्ध भविष्याचा पाया आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. 


महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसहाय्यता समूहांना कर्ज धनादेश प्रदान कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, सहायक गट विकास अधिकारी नंदन जंराडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने, गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी, बांधकाम विभागाचे उप अभियंता शिवकुमार कुपल, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी आदी उपस्थित होते. 


पवार म्हणाले, यावर्षी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिजन्मशताब्दीवर्ष, कोल्हापूर करवीर संस्थानच्या संस्थापक छत्रपती रण रागिणी महाराणी ताराबाई ३५० व, त्रिशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष असून यानिमित्ताने राज्य शासनाच्यावतीने वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊमाँसाहेब, छत्रपती महाराणी ताराबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्राच्या इतिहासाचा गौरवशाली अध्याय असून हा गौरव जपण्यासोबतच वाढविण्याचे काम करावे. महाराष्ट्राच्या मातीला राजमाता जिजाऊमाँसाहेब, छत्रपती महाराणी ताराबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा असून त्यांनी कृतीतून दिलेल्या वाटेवरच वाटचाल करायची आहे, त्यांच्या कार्याचा वारसा जपत पुढे नेण्यासाठी पुढाकार घ्यावा. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे अलौकिक असून त्या सर्वोत्कृष्ट राज्यकर्त्या, शासक होत्या, त्यांच्या अंगी प्रजेच्या कल्याणाप्रती असलेली तळमळ ही त्यांच्या कार्यातून दिसून येते. त्यांनी देशात सुंदर मंदिरे उभी करण्यासोबतच विविध नद्यांच्याकडेला घाट, धर्मशाळा, गावोगावी रस्त्याचे बांधकाम, पाणपोई उभारणीचे काम केले असून असे लोककल्याणकारी कार्य त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत आहेत. त्यामुळे शेकडो वर्षांपूर्वी बांधलेले बारव, घाट नादुरुस्त झालेले असल्यास त्याची दुरुस्ती करण्याचे काम राज्यशासनाने हाती घेतले आहे.

महिलांच्या सक्षमीकरणाकरीता विविध क्रांतिकारी निर्णय

देशाला आत्मनिर्भर करतांना महिला आत्मनिर्भर झाल्या पाहिजे, याकरीता राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरणाकरीता विविध लोककल्याणकारी, क्रांतिकारी निर्णय, उपक्रम हाती घेण्यात आले असून त्यामध्ये स्वतंत्र महिला धोरण, वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क, शासकीय सेवेत ३३ टक्के राखीव जागा, स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण, एसटी बस भाड्यात ५० टक्के सवलत, मुलींना मोफत शिक्षणदेण्यासोबतच उच्च व तांत्रिक शिक्षण मोफत यांच्यासह 
राज्यात ७ लाख नवीन बचतगटांची स्थापना करण्यासोबतच बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत ३० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


महिलांच्या उन्नतीकरिता माझी लाडकी बहीण योजना,नमो महिला सक्षमीकरण अभियान, पिंक महिला रिक्षा योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लेक लाडकी योजना, लखपती दिदी, राजमाता माँ जिजाऊ गृहस्वामीनी योजनेअंतर्गत महिलांच्या नावावर घर खरेदी करतांना मुद्रांक शुल्कात सवलत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थ्यांनी प्रवास सवलत योजना, नव तेजस्वी ग्रामीण महिला उद्यम विकास योजना, तेजस्विनी विशेष बस सेवा, चौथे अष्टसूत्री महिला धोरण, नावांमध्ये आईचा नावाचा समावेश, शुभ मंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेच्या अनुदानात वाढ, गरोदर महिला आणि बालकांना आरोग्य संस्थेत नेण्यासाठी ३ हजार ३२४ रुग्णवाहिका खरेदी, ५० नवीन शक्ती सदनाची निर्मिती, बाल संगोपन योजनेच्या अनुदानात वाढ, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, १२ जिल्ह्यात वात्सल्य भवन उभारणी, महिला आणि बाल सशक्तीरणाकरिता जिल्हा नियोजन समितीत ३ टक्के निधी राखीव, राज्य राखीव महिला पोलीस दलाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


बारामती तालुक्यात महिला बचतगटांना ४ कोटीहून कर्ज वाटप

या वर्षी बारामती तालुक्यातील बचत गटांना सुमारे ३ कोटी १५ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असून १ कोटीहून अधिक रुपयांच्या कर्ज मंजूरी आदेश वाटप करण्यात येत आहे, ही रक्कम नसून नव्या प्रवाशाची सुरुवात आहे, घराघरामध्ये नवीन उद्योग उभारण्यास हातभार लागणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या स्वप्नांना आणि पंखांना बळ मिळणार असून पाल्यांना शिक्षण, कुटुंबाला स्थर्य पर्यायाने गावाची समृद्धी होण्यास मदत होणार आहे, असेही पवार म्हणाले. डॉ. बागल यांनी प्रास्ताविक केले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment