झैनबिया स्कूल कटफळमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा
बारामती
कटफळ येथील अब्बास मोहम्मद हुसेन ट्रस्ट संचलित झैनबिया स्कूल कटफळ येथे भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त पोलीस अधिकारी ACP इसाक बागवान साहेब व संस्थेचे पदाधिकारी वर्ग इत्यादी उपस्थित होते. व यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी आरोही गावडे आणि आदित्य राऊत यांनी केले. इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत उत्तम प्रकारे सादर केले. इयत्ता आठवी,नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी परेड करून ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी इयत्ता चौथी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध गाण्यावर नृत्य, नाटके, वेशभूषा यांचे सादरीकरण केले. विद्यार्थिनींनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आर्थिक सामाजिक,राजकीय, शिक्षण अशा विविध विषयांवर भाषणे करून मुलांच्या अंगी असणाऱ्या वक्तृत्वगुणांचे दर्शन घडविले. यावेळी विविध क्रीडा क्षेत्रात व परीक्षेत गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. लीड स्कूल तर्फे वृंदा पोटे,आयमन पित्तलवाला, भाग्यश्री क्षीरसागर, मेहजबिन शेख यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.
शाळेच्या प्राचार्या. इन्सिया नासिकवाला मॅडम यांनी हा कार्यक्रम सुरुवातीपासून शेवटपर्यंत विद्यार्थ्यांनी सादर केला त्याबद्दल सर्वांचे कौतुक केले तसेच मूर्तझा नासिकवाला, हुसेन नासिकवाला, हुजेफा कायमखानी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाचे शोभा वाढविण्यासाठी पालक वर्ग व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment