सेक्टर अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्याअनुषंगाने सूक्ष्म नियोजन करावे-निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी
बारामती,
सेक्टर अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक बाबीची अद्ययावत माहिती करुन घ्यावी; निवडणूकी संदर्भातील प्रत्येक कामासाठी सूक्ष्म नियोजन करुन कार्यवाही करावी, असे निर्देश बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिले.
बारामती येथे आयोजित सेक्टर अधिकाऱ्यांच्या कामकाज आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार बारामती गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, संबंधित सेक्टर अधिकारी, समन्वय अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती द्विवेदी म्हणाल्या, सेक्टर अधिकाऱ्यांनी निवडणूक विषयक नियमांच्या पुस्तिकेचे वाचन करावे. भारत निवडणूक आयोगाच्या ॲप व त्यामधील सुविधेबाबत माहिती जाणून घ्यावी. निवडणुकीच्यावेळी सोबत क्षेत्रीय आराखडा, ओळखपत्र, संबंधितांचे संपर्क क्रमांक, संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्राची माहिती, मार्गनिहाय आराखडे, नकाशे आदी सोबत बाळगावे. प्रत्येक मतदान केंद्राला भेटी द्याव्यात.
निवडणूकविषयक आयोजित आढावा बैठक, प्रशिक्षणास उपस्थित राहून कामकाजाविषयी माहिती घ्यावी. कामे करतांना शंका निर्माण झाल्यास समन्वयक अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यासोबत समन्वयक ठेवावा. नियुक्त महिला कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.
मतदानाच्या कालावधीत वाहनासह अधिकारी व कर्मचारी वेळेत मतदान केंद्रावर पोहचतील, असे नियोजन करावे. प्रत्येक वाहनाच्या दर्शनी भागात स्टिकर चिकटावे. मतदान केंद्रस्तरावर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कार्यवाही करावी. निवडणुकीच्याअनुषंगाने देण्यात येणाऱ्या विविध परवान्यासाठी एक खिडकी सुविधा सुरू करुन संबंधितांना परवाने द्यावेत. मतदानाच्या एक दिवस आधीपासून नियंत्रण कक्षात पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करावे. वेळेत अहवाल सादर होईल, याबाबत दक्षता घ्यावी.
निवडणुकीच्या सर्व जबाबदाऱ्या अत्यंत गांभीर्याने आणि लक्षपूर्वक पार पाडाव्यात. विविध अधिकाऱ्यांशी समन्वय साधून निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे, असे निर्देश श्रीमती द्विवेदी यांनी दिले.
Post a Comment